भारतीय सौर कालगणना
  

राष्ट्रीय दिनदर्शिका :

     डॉ. मेघनाद साहा यांच्या समितीने सौर दिनदर्शिका सुचविली आहे. मात्र ती जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांची नाही. त्यातील महिन्यांची नावे, वर्षारंभाचा दिवस इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत आणि वेगळेपण का व कसे ते आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या १२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत, फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव 'अग्रहायण' असे आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षाचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. या तारखेला राष्ट्रीय दिनदर्शिका १ चैत्र या नावाने संबोधते. राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वैशाखापासूनचे महिने पुढील तारखांना सुरू होतात. वैशाख (२१ एप्रिल), ज्येष्ठ (२२ मे), आषाढ (२२ जून), श्रावण (२३ जुलै), भाद्रपद (२३ ऑगस्ट), आश्विन (२३ सप्टेंबर), कार्तिक (२३ ऑक्टोबर), अग्रहायण (२२ नोव्हेंबर), पौष (२२ डिसेंबर), माघ (२१ जानेवारी), फाल्गुन (२० फेब्रुवारी).

     वर्षाचा क्रमांक शालिवाहन शकाप्रमाणे घेतात. या महिन्यांचे दिवस एक आड एक ३० किंवा ३१ असे घेत नाहीत. वैशाख ते भाद्रपद या सलग ५ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ असून उरलेल्या ७ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३० घेतात. अशा त-हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते. सूर्य उत्तर गोलार्धात असण्याचा काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील कालावधीपेक्षा थोडा जास्त आहे, त्यामुळे वैशाख ते भाद्रपद या सलग महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ घेण्याची शिफारस समितीने केली.

     जे इंग्रजी वर्ष लीप वर्ष असते त्या वर्षी सुरू होणारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्षही लीप वर्ष घेतात. मात्र त्या वर्षी चैत्र महिन्याचेही ३१ दिवस घेतात आणि अशा लीप वर्षाची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्च रोजी करतात.

राष्ट्रीय दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक :

     वरील विवेचनावरून राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये आणि त्याची शास्त्रीय बैठक आपल्या लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडित आहे. चैत्र आणि आश्विन महिन्यांच्या सुरुवातीस (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य संपातबिंदूवर असतो. दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरू होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाचीही सुरुवात असते. (२२ डिसेंबर) इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडित नाही. वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस घेण्यामागील भूमिकाही आपण पाहिली.